
टोमॅटो पिकावरील रोग व्यवस्थापन
टोमॅटो पिकावरील रोग कोणते आहेत व व्यवस्थापन कशे करायचे?
१) लवकर येणारा करपा (अर्ली ब्लाइट)-
लक्षणे -अल्टरनेरीया सोलॅनी नावाच्या बुरशीमुळे होणे जमिनीलगतच्या पानांवर लहान गोलाकार ते आकारहीन, तपकिरी ते काळपट रंगाचे वलयांकित ठिपके पडतात.ठिपके एकमेकात मिसळून मोठ्या आकाराचे तपकिरी चट्टे पानावर तयार होतात. यामुळे पाने करपून गळतात.पानाप्रमाणे खोडावर देखील गर्द तपकिरी वलयांकित डाग पडतात,फांद्या कमकुवत होऊन मोडतात.
ब) उशिरा येणारा करपा ( लेट ब्लाइट)-
लक्षणे -फायटोप्थोरा इन्फेस्टन्स नावाच्या बुरशीमुळे.पाने, खोड, फांद्या आणि हिरव्या, लाल फळांवर आढळून येतो. सुरवातीला पानावर काळपट ते फिक्कट तपकिरी रंगाचे गोलाकार ठिपके दिसून येतात.रोगाचा प्रादुर्भाव वाढून खोड, पाने आणि फळांवर पसरून पाने करपून गळतात.
उपाय : पिकाची फेरपालट करावी. लागवडीपूर्वी रोपांवर थायरम या बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी. झाडावरील तसेच जमिनीवर पडलेले रोगग्रस्त फळे, पाने गोळा करून जमिनीत गाडावित अथवा जाळून नष्ट करावीत.
2) मर (डॅम्पिंग ऑफ)-
स्टेज – रोपवाटिका
लक्षणे -पिथियम या रोगजंतुमुळे होतो.वातावरणातील बदल हा या रोगाच्या प्रसाराचे मुख्य कारण आहे.कमाल तापमान, जास्त आर्द्रता, जमिनीमध्ये अयोग्य पाणी निचरा व नत्रयुक्त खतांचा अति वापर अशा कारणामुळे हा रोग पसरतो.
उपाय :टोमॅटो पुर्नलागवडीपूर्वी जमिनीत प्रती हेक्टरी २ ते ५ किलो ट्रायकोडर्मा जमिनीत चांगल्या कुजलेल्या शेणखताबरोबर सरीतून मिसळावे. या रोगाच्या नियंत्रणासाठी टोमॅटो लागवडीपासून दुसऱ्या आठवड्यात व तिसऱ्या आठवडयात 10 ली. पाण्यात 30 ग्राम कॉपर ओक्झीक्लोराईड 50% किंवा 25 ग्राम मंकोझेब मिसळून आळवणी करावी
(३) फ्युजॅरियम विल्ट (मररोग)-
लक्षणे -मातीत असलेल्या फ्युजॅरियम ऑक्झिस्पोरम ह्या बुरशीमुळे हा रोग येतो. रोगग्रस्त झालेली रोपे किंवा झाडे पिवळसर होवून अचानक वाळतात. हि पिवळी पाने नंतर तपकीरी रंगाची होवुन गळुन जातात.रोपांवर असलेल्या तणावात पाण्याची कमतरता, जास्त पाणी, अन्नद्रव्यांची कमतरता, तापमानाचा ताण, आर्द्रता, रोगांचा किंवा किडींचा हल्ला ह्या आणि ईतरही अनेक घटकांमुळे हा रोग येतो
उपाय :रोप उगवणीनंतर लागलीच पिकास ट्रायकोडर्मा बुरशीचा वापर जमिनीतुन करावा. ट्रायकोडर्मा बुरशी मुळांच्यावर कवच तयार करुन रोगापासुन रक्षण करण्यास मदत करते.स्थिर झालेल्या बुरशीच्या नियंत्रणासाठी बॅसिलस सबटि ह्या जीवाणूचा जमिनीतून वापर करावा.
४) व्हर्टिसिलियम विल्ट :
व्हर्टिसिलियम विल्ट या बुरशीमुळे रोगग्रस्त झालेली रोपे किंवा झाडे खालून वर पिवळसर होत जातात व गळून पडतात. व्हर्टिसिलियम विल्ट हा रोग उबदार, ओलसर वातावरणात रोगाची लागण जास्त असते. पिक तणावाखाली असतांना तसेच फळ तयार होत असतांना रोगाची लागण होते. या रोगात पिकाच्या तळाकडील पाने पिवळी पडतात व हा पिवळेपणा शेंड्याकडे वाढत जातो. रोगाची बुरशी पिकाच्या मुळांत शिरते, आणि पिकाची रसवाहीनी बंद करते ज्यामुळे पाने पिवळी पडतात. व्यवस्थापनासाठी ट्रायकोडर्मा आणि बॅसिलस सबटिलस चा वापर हा पिक लागवड करत असतांनाच सुरवातीस आणि नियमित पणे जेव्हा जेव्हा रोगासाठी पोषक वातावरण असेल तेव्हा करावा.
उपाय : ट्रायकोडर्मा आणि बॅसिलस सबटिलस याचा ५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे आळवणी करावी. त्याचबरोबर 2 ग्रॅम बाविस्टिन प्रती लिटर पाणी याप्रमाणे फवारावे
५) सेप्टोरिया पानांवरील ठिपके
सेप्टोरिया लायकोपेरसिसा या नावाच्या बुरशीमुळे ठिपके येतात. जुन्या पानांकडून नवीन कोवळ्या पानांपर्यंत लक्षणे पसरतात. पानांवर बारीक पाणी शोषलेले गडद तपकिरी कडा असलेले राखाडी रंगाचे गोलाकार ठिपके जुन्या पानांनवर खालच्या बाजूला उमटतात. खोडावर व फुलांवर याच पद्धतीचे लक्षणे दिसून येतात.रोगाचा प्रादुर्भाव फळांवर फार कमी म्हणजे कधीतरी दिसून येतो.
उपाय :रोगांची लक्षणे दिसताच २५ ग्रॅम क्लॉरोथलोनिल ७५%WP किंवा ४० मिली मायक्लोब्युटानिल किंवा १५ ग्रॅम झायनेब किंवा २५ ग्रॅम मॅन्कोझेब हे बुरशीनाशक प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी..
६) जिवाणुजन्य डाग / ठिपके (बॅक्टेरियल स्पॉट)-
लक्षणे -रोगाचा जीवाणू पिकांत पर्णरंध्र, आणि जखमांतून प्रवेश मिळवतो.सुरवातीला लाल करड्या रंगाचा ठिपका नंतर काळ्या मोठ्या ठिपक्यामध्ये रुपांतरित होऊन ठिपक्याच्या कडा पिवळ्या होतात. नुकसानग्रस्त पाने पिवळी पडून गळतात. खोडावरील ठिपके फांद्यांवर पसरून परिणामी खोड व फांद्या वाळतात.
उपाय :रोगांची लक्षणे दिसताच १ ग्रॅम स्ट्रेप्टोमायसीन अधिक ३० ग्रॅम कॉपर ऑक्झिक्लोराइड प्रति १० लिटर पाण्यात घेऊन पिकावर फवारणी करावी.
7) फळसड रोगकारक बुरशी ( बकआय रॉट )-
हा रोग फायटोप्थोरा निकोशियाना पॅरासिटिकाव फायटोप्थोरा कॅपसीसीया बुरशीमुळे होतो. या रोगामुळे फळावर बदकाच्या डोळ्याच्या आकाराचे तपकिरी रंगाचे वलय दिसतात अशी वलये नंतर सडतात आणि फळे खराब होऊन उत्पादनात घट येते.
उपाय :झाडावरील तसेच जमिनीवर पडलेली रोगग्रस्त फळे, पाने गोळा करून बांधावर किंवा टोमॅटो प्लॉटच्या शेजारी न टाकता त्यांना जमिनीत गाडावीत किंवा जाळून नष्ट करावीतकार्बेन्डाझिम १ ग्रॅम किंवा मँकोझेब २.५ ग्रॅम किंवा टेब्युकोनॅझोल १ मि.लि. प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
८) भुरी रोग-
लक्षणे -पानाच्या खालच्या बाजूवर पांढरे चट्टे पडतात आणि त्यांचे प्रमाण वाढल्यास पानांची गळ होते.सुरवातीला पानाच्या वरच्या बाजूला पिवळसर डाग दिसतात. नंतरच्या काळात या रोगामध्ये सुरवातीला पांढरी व नंतर राखाडी पिठासारखी पावडर पानांवर तसेच फांद्या व फळांवर पसरते. प्रकाशसंश्लेषन क्रियेमध्ये अडथळा निर्माण होतो.
उपाय-कीड आणि रोगांच्या विरोधी लढण्याची क्षमता वाढीसाठी पिकांवर सिलिका घटक असणारे सिलिकॉन @1 मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन पिकात फुलोरा अवस्थेपूर्वी २ वेळा फवारणी करावी. शेवटच्या टप्प्यात रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी रासायनिक घटकांचा वापर करावा. यामध्ये तीव्रता कमी असल्यास पाण्यात विरघळणारे गंधक ३० ग्रॅम किंवा ५ ते १० ग्रॅम मायक्लोबुटानिल किंवा हेक्साकोनॅझोल १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी
(९)डायबॅक आणि फळ सडणे / फळ कुजव्या-
लक्षणे -पावसाच्या पाण्याचे थेंब देठावर पडून, तेथून सरकून देठाच्या बेचक्यात, देठ व फळ जेथे जोडले जाते तेथे शिरून फळ कुजण्यास सुरुवात होते. देठाच्या भोवताली, फळाच्या तळाजवळ करड्या रंगाची रिंग स्पष्ट पणे दिसते. पिकाची फांदी शेंड्याकडून खालच्या दिशेने वाळत येते. या रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या हिरव्या किंवा लाल टोमॅटोवर वर्तुळाकार खोलगट डाग दिसतात.झाडे सुकून वाळतात तसेच पानांवर आणि फांद्यांवर काळे ठिपके दिसतात.
उपाय डायबँक आणि फळ सडणे / फळकुजव्या हा रोग बियाण्यापासून होत असल्यामुळे रोगमुक्त बियाण्याचाच वापर करावा.बुरशीजन्य रोग आढळून आल्यानंतर २५ ग्रॅम मॅन्कोझेब किंवा १० मिली किटाझीन ४८% ई.सी. किंवा ३० ग्रॅम कॉपर ऑक्झिक्लोराईड १० लिटर पाण्यात घेऊन गरजेनुसार नियंत्रित फवारण्या घ्याव्यात.
१०) कॉलर रॉट / करकोचा-
लक्षणे -टोमॅटोची लागवड झाल्यानंतर लगेच तापलेल्या जमिनीमध्ये प्रथम पाऊस पडतो तेव्हा रोपांच्या उजव्या बाजूकडील शेंडा पिवळसर होऊन करपा पडल्यासारखी लक्षणे दिसू लागतात व संपूर्ण शेंडा नंतर करपून प्रथम करड्या रंगाचा ठिपका असलेले व्रण नजरेस पडतो. आठ दिवसात अन्न व पाणी वाहक पेशी तोडल्या जातात आणि मग झाड कोलमडते.
उपाय :रोगाचे प्रमाण वाढल्यास मॅकोझेब ७५% wp. २५० ग्रॅम आणि कॉपर ऑक्सिक्लोराईड ५०%wp. २५० ग्रॅम हे २०० लिटर पाण्यात २० ते ३० मिनीट एकत्र करुन ठेवावे. त्यानंतर हे द्रावण ड्रिप ने शेतात सोडावे अथवा ड्रेचिंग करावी.