मिरचीवरील कीड व्यवस्थापन

October 10, 2023

मिरची या पिकावर रस शोषण करणारी कीड जास्त प्रमाणात आढळते. त्यापैकि  फुलकिडे, तुडतुडे, पांढरी माशी तसेच कोळी व मावा या प्रमुख किडींचा प्रादुर्भाव आढळतो.

१ ) फुलकिडे ( thrips )-

मिरचीवर फुलकिडे ( थ्रिप्स ) या कीटकांचा प्रादुर्भाव शेंड्यावर किंवा पानाच्या खालच्या बाजूला आढळून येतो. हे कीटक आकाराने अतिशय लहान म्हणजेच १ मीली. पेक्षा कमी लांबीचे असतात त्यांचा रंग हा फिकट पिवळा असतो. हे कीटक पानावर ओरखडे पडतात व त्यामधून निघणारा रस शोषून घेतात. त्यामुळे पाने वाकडी होतात व पानांच्या कडा ह्या वरच्या बाजूला वळतात आणि बारीक होतात. यालाच आपण चुरडा- मुरडा रोग असे म्हणतो. हे कीटक खोडातील देखील रस शोषून घेतात. त्यामुळे खोड कमजोर बनते व पानांची गळ होते.

उपाय : –      या कीडीच्या नियंत्रणासाठी डायमेथोएट ५०० मी. ली. ५०० लिटर पाण्यातून प्रती हेक्टरी फवारावे. किंवा निंबोळीअर्क ४ टक्के फवारावे. ( या किडीच्या चांगल्या नियंत्रणासाठी लागवडी पासून ३ आठवड्यांनी पिकावर १५ दिवसांच्या अंतराने शिफारशीप्रमाणे कीटक नाशकांचा आलटून पालटून वापर करावा.

२ ) तुडतुडे (Jassid)-

तुडतुडे हि कीड पानातिल रस शोषून घेते तसेच तुडतुडे आणि त्यांची पिल्ले पानाच्या खालच्या बाजूने राहून त्यातील रस शोषण करतात. या किडीचा जास्त प्रादुर्भाव झाल्यास पाने मुरगळतात व परिणामी झाडांची वाढ खुंटते

उपाय : –मिरचीवरील या किडीच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रिड ४ मी.ली किंवा थायमेथोक्झाईम ४ ग्रॅम किंवा डायमेथोएट १० मी.ली १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ( या व्यतिरिक्त मोनोक्रोटोफॉस, सायपरमेथ्रिन, असिटामीप्रिड, निम अर्क याही कीटक नाशकांचा प्रादुर्भावानुसार शिफारशीप्रमाणे वापर करावा. )

३ ) पांढरी माशी ( White Fly )

पांढरी माशी हि कीड देखील पानातील रस शोषण करते. या किडीमुळे पाने पिवळी पडतात व करपतात  या किडीच्या प्रादुर्भावाणेदेखील पिकाचे व उत्पन्नाचे  मोठ्या प्रमाणावर नुकसान होते.

उपाय : –  पांढर्‍या मशीच्या नियंत्रणासाठी मिथील डिमेटॉन १० मी.ली. किंवा डायमेथोएट १० मी.ली. १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

४ ) कोळी ( Mite )

हि कीड देखील पानातील रस शोषून घेतात परिणामी पानांच्या कडा  खाली वळतात. तसेच पानांचा देठ लांबतो.

उपाय : –या किडीच्या नियंत्रणासाठी पाण्यात विरघळणारा गंधक ८० टक्के २५ ग्रॅम  किंवा डायकोफॉल २० मी.ली. १० लीटर पाण्यात मिसळून फवारावे. ( या व्यतिरिक्त आबामेक्टिन १.९ टक्के (w/w) EC , बायफेणझेट २२.६ टक्के SC या कीटकनाशकांचा शिफारशीप्रमाणे लाल कोळीच्या नियंत्रणासाठी वापर करता येतो . )

५ ) मावा

हे कीटक मिरचीची कोवळी पाने आणि शेंड्यातील रस शोषण करतात. त्यामुळे नवीन पालवी येणे बंद होते.

उपाय- मिरची वरील या किडीच्या नियंत्रणासाठी लागवडिनंतर १० दिवसांनी १५ मी.ली मोणोक्रोटोफॉस ३६ टक्के प्रवाही किंवा डायमेथोएट १० मी.ली. १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.